दिनांक : १४ फेब्रुवरी २०१५
सावनी ची स्वतःला वाढदिवसाची भेट
काल रात्रभर सावनी ची चुळबुळ चालु होती. त्यामुळे आम्हा दोघांचीही झोप व्यवस्थित झाली नव्हती. सकाळी माझे डोळे उघडले तर मानसी आसपास नव्हती आणि सावनी कुशीवर वळत होती. मी तिच्याकडे कौतुकानी पाहत होतो. अर्थात तिला ते माहित नसावं, तिचे प्रयत्न चालूच होते. कुशीवर वळता वळता ती पालथी पडली.
पण हात अडकलेला. मग तो काढण्याची धडपड सुरु झाली. मी मानसी ला हाक मारून तेवढ्यात बोलावून घेतलं. आम्ही दोघा कौतुकानी तिचे ते प्रयत्न पाहत होतो. बराच जोर लावूनही तिला काही तो हात काढणं जमेना मग सरतेशेवटी दुसर्या हातानी जोर लावून पुन्हा पाठीवर …
दिनांक : ७ मार्च २०१५
आज संध्याकाळी ५ च्या सुमारास मानसी च फ़ोन आला. तीचा सूर काळजीचा होता. सावनीला खोकला येत होता आणि तिच्या घशात काहीतरी अडकल्यासारख असावं अस म्हणाली. २-३ उलट्या झाल्या होत्या. मी जेवढ्या लवकर निघता आल तेवढ निघून घरी आलो. मी पोहोचेपर्यंत सावनी थोडी शांत झाली होती. मात्र मी घरी आल्यावर माझ्या कडेवर आल्यावर मला एकदम बिलगली. प्रथमच तिनी घट्ट मिठी मारली आणि माझ्याशी तिच्या भाषेत बोलायला लागली. मग आमची गाणी म्हणून झाली, गप्पा झाल्या, फिरून झाल. पूर्ण वेळ सावनी माझ्या खांद्यावर मान ठेवून छान ऐकत होती. थकली असावी.
घरी आई ला फोन केला तेंव्हा ती म्हणाली की होत असा कधी कधी. हात पाय ओल्या फडक्यान पुसून घेतले. मग थोडी शांत झाली.
दिनांक : ८ मार्च २०१५
आज घरी आलो तर नवीनच बातमी ! सावनी ला दात येत आहेत :)
मग हात धुवून तिच्या छोट्याश्या ओठांच्या आत पहिला तर खरच ! खालच्या हिरड्या टणक झाल्या आहेत. आणि पुढच्या २ दातांच्या जागी बारीक कणी हाताला लागत आहे. कदाचित म्हणूनच कालचा त्रास तर झाला नसेल?
गेले दोन दिवस बाबांचा फोन येत आहे सावनी च्या तब्येतीच्या चौकशी साठी … काळजी करण्याची सवय बाबांकडून आली असावी माझ्याकडे :)
दिनांक : १४ एप्रिल २०१५
आज सावनी ६ महिन्याची झाली. खरच वाटत नाही कधी कधी की हे पिल्लू इतकं पटापट मोठं होतंय. मानसीनी तिच्यासाठी २ फ्रॉक ऑर्डर केले होते. ते तिला घातले. मी रजा घेतली आहे. तिचे खूप फोटो काढले आहेत. एकदम गोडंबा दिसते आहे.
दिनांक: १६ एप्रिल २०१५
आज कृणाल च्या मुलाच्या (ध्रुव) वाढदिवसाला गेलो होतो. तिथे सर्वांचा लक्ष सावनी कडेच होत. मला सुद्धा वाटून गेलं की सावनी ला दृष्ट लागेल … ! तिला बिचारीला झोप आली होती आणि आम्ही मात्र तिला सगळीकडे नाचवत होतो. घरी आल्यावर मात्र तिला आंघोळ घालून मगच झोपवल. तेवढंच ती फ्रेश होते.
दिनांक: १८ एप्रिल २०१५
काल रात्री सर्व फोटो ट्रान्स्फर करून थोडे प्रोसेस सुद्धा केले. ते अपलोड केल्या केल्या कमेंट्स चा वर्षाव सुरु झाला आहे. दिवसभरात १०० हून जास्त लाइक्स मिळाल्यामुळे मानसी खूष ! सावनी अर्थातच त्याच काही गम्य नाहीये. हुश्श !
दिनांक : ५ ऑक्टोबर
आज बाबांनी सावनी चा एक किस्सा सांगितला. ते तिला फोन वरती गाणी ऐकवतात. आज सावनी त्यांच्या फोन वरती सारखा सारखा हात फिरवत होती. बाबांनी ते पाहिलं आणि तिला विचारलं,
काय हव आहे सावनी?
सावनी: आ sssssss आ ssssss
म्हणजे गाणं हवं आहे !!!!!